छत्तीसगड : छत्तीसगडच्या बस्तरमधील लोकप्रिय पत्रकार मुकेश चंद्राकर (३३) नववर्षाच्या दिवशी बेपत्ता झाले होते. त्यानंतर शुक्रवारी (३ जानेवारी) त्यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला आहे. विशेष म्हणजे ज्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे चंद्राकार यांनी समोर आणले होते. त्याच रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे चंद्राकार यांची हत्या केल्याची चर्चा होत आहे.
मुकेश चंद्राकार यांनी अनेक वृत्तवाहिन्यात काम केले होते. तसेच बस्तर जंक्शन नावाचे त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनेलही ते चालवत होते. बस्तर सारख्या नक्षलवादी भागात त्यांनी आजवर न घाबरता वार्तांकन केले होते. एप्रिल २०२१ मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले असता त्यांना सोडविण्यात मुकेश चंद्राकार यांची महत्त्वाची भूमिका होती. तेकुलगुडा या भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत २९ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला होता.
मुकेश यांनी नुकतेच बिजापूर येथील एका रस्ते कामात घोटाळा झाल्याचे सर्वांसमोर आणले होते. त्यांच्या बातमीमुळे यंत्रणेने सदर कामाची चौकशी सुरू केली होती. या बातमीमुळेच मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
हत्येची बातमी समोर आल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एक्सवर पोस्ट करून दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, बीजापूरचा युवक आणि एक धडाडीचा पत्रकार मुकेश चंद्राकरच्या हत्येची बातमी दुःखद अशी आहे. मुकेशचे निधन पत्रकारिता आणि समाजाची खूप मोठी हानी आहे. या प्रकरणात आरोपींना सोडले जाणार नाही. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मी दिले आहेत.