परभणी : परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्रीडा विभागात केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना एक लाख रुपयाची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. या क्रीडा विभागातील लाच प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पूलचं मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते त्यानंतर ही रक्कम द्यायची नव्हती. त्यामुळे या तक्रारदाराने परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सध्या कविता नावंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे दरम्यान, कविता नावंदे यांच्यावर यापूर्वीही गैरव्यवहारांचे अनेक आरोप करण्यात आले होते.