शिर्डी: शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावेत, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून रोज ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली. संपूर्ण राज्यातील भिकारी शिर्डीत येत आहेत. त्यामुळे ही योजना बंद करावी, असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी रोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यातच आता साई संस्थानाच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी केली. अख्खा देश येथे येऊन फुकट जेवण करीत आहे.
महाराष्ट्रातील सगळे भिकारी येथे गोळा झाले, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले. मात्र चांगले शिक्षक तेथे नाही. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. याचा काय उपयोग, असे म्हणत सुजय विखेंनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवर ताशेरेही ओढले.
हा साईभक्तांचा अवमान
शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी देशातील भिकारी येथे येऊन जेवतात, असे म्हणणे हा साईभक्तांचा अपमान आहे, असे म्हटले. अन्नदान हे चांगले काम आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक झाले पाहिजे. येथे येणारा भाविक कोण असतो, याचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला
माजी खासदार सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला आहे. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील, हे मी मान्य करतो. पण त्यांचा तसा हेतू नव्हता, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.