मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. पक्ष फोडणे, पैसे वाटप करणे, खूप काही महाराष्ट्रात चालले आहे. महाराष्ट्रासह देशाला दिशा देणाऱ्यांची गरज आता निर्माण झाली आहे. देशाला शिक्षण देण्याबरोबरच तरुणांसोबत घेऊन पक्ष सिद्धांतावर राजकारण करणाऱ्या पक्षाची देशाला गरज आहे. त्यामुळे नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच पक्षाचे नाव व चिन्ह जाहीर करू, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील स्थिती काय आहे. सद्यस्थितीत सुरू असलेले राजकारण हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. आम आदमी पार्टीला वैतागून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय अंजली दमानिया यांनी घेतला होता.
आम्हाला विधानसभेत मिरवायची हौस नाही, पक्षात इतकी वर्षे काम करणारी लोक या पक्षातून त्या पक्षात जात असतील, तर आम्हाला महाराष्ट्राचे राजकारण सुधारायचे आहे. देशाला चांगल्या शिक्षणाची गरज असून, यासाठी राजकीय पक्ष काढत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
राजकीय पार्टी बनविण्यासाठी रविवारी पहिली बैठक झाली. पक्षाची भूमिका मांडताना हा पक्ष शेतकऱ्यांचा, ऊसतोड कामगारांचा असणार आहे, तरुणांना बरोबर घेऊन सोशल मीडियाचा वापर करून तरुण लोकांना सोबत घेऊन आपला पक्ष सिद्धांतांवर राजकारण करेल, असे दमानिया यांनी या वेळी सांगितले.
राजकीय पक्षांना चाप बसणे गरजेचे
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण काय आहे, याचे व्हिजन आम्ही सर्व लोकापुढे आणू, दरवेळी जातीचे कार्ड काढून राजकारण केले जाते. देश प्रगतीच्या मार्गावर न्यायचा असेल तर रस्त्यात उतरताना आपण आधी भारतीय आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय पक्षाना चाप बसायला हवा. त्यांना आमच्या पक्षाकडून राजकारण कसे असते, हे कळेल, देशाला पुढे नेणारे तळमळीचे लोक या पक्षात असतील, असेही दमानिया यांनी म्हटले.