योगेश मारणे /न्हावरे : घोडगंगा कारखाना बंद असल्यापासून ऊस तोडणीसाठी टोळी मिळत नसल्यामुळे एकरी चार ते पाच हजार रुपये ऊस तोडणीसाठी द्यावे लागत आहेत. तर दुसरीकडे याच भागामध्ये नर भक्षक बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. तरीही परिसरातील बिबटे जेरबंद होत नाहीत. त्याचप्रमाणे बिबट्यांचे माणसांवर व पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी पिंजरे कधी खरेदी करणार? वेळेवर पिंजरे मिळणार नसतील तर त्या पिंजऱ्यांचा उपयोग काय ? तसेच चासकमान डाव्या कालव्याचे पाणी ‘टेल’कडील भागाला कधी पोहचणार. या सर्व बाबींमुळे नव्या आमदारांची पोकळ आश्वासने हवेतच असल्याची भावना शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
न्हावरे आणि मांडवगण फराटा व पंचक्रोशी परिसर तसेच शिरूरच्या पूर्व भागात अनेक गावांत निवडणूकीपूर्वी महायुतीचे उमेदवार व नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी निवडणूकी दरम्यान उसाचा प्रश्न सोडवणार असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी साखर कारखाने बंद असल्यामुळे कटकेंनी आपण आमदार झाल्यावर आणि पुढे कारखाने सुरू झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याचे उसाचे टिपरू शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतू, त्यानंतर विधिमंडळाचे अधिवेशन झाले. दुसरीकडे साखर कारखाने सुरू झाले.
आमदारांचे आभार दौरे सुरूच, उसाचा प्रश्न कधी सुटणार?
ऊस तोडणी मिळवण्यासाठी शेतकरी संबंधित कारखान्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हातापाया पडत आहेत, तरी देखील अद्याप पर्यंत ऊस तोड अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या आमदार हार-तुरे आणि शुभेच्छा यामध्येच गुंतले असून, अजूनही त्यांचे आभार दौरे सुरूच आहेत. या आभार दौऱ्यांमध्ये ते ठीक-ठिकाणी उसाचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगत आहेत. परंतु, अनेक शेतकऱ्यांचा गेले दीड ते दोन महिने झाले तरी ऊस जात नाही. अशा शेतकऱ्यांचा ऊस कधी तोडला जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याला जाणे बाकी आहे, शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी टोळ्या मिळत नसल्यामुळे ऊस शेतात तसाच उभा असून शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे अशक्य बनले आहे. त्यामुळे उसाच्या वजनात व रिकव्हरीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. निवडणुकीत नेत्यांनी दिलेली आश्वासने जर आता वेळेत पूर्ण होणार नसतील तर त्या आश्वासनांचा काय उपयोग असा संतप्त सवाल शिरुरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शिरूर तालुक्याच्या शेजारी दौंड तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना, दौंड शुगर, अंबालिका शुगर तसेच श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, गौरी शुगर साखर कारखाना आणि शेजारी आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांच्या ऊस तोडणी टोळ्या मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही जिकिरीचा संघर्ष करावा लागत आहे.
राजकीय आश्वासन हवेतच
दरम्यान, कारखान्याच्या वरिष्ठांना ऊसाच्या प्रश्ना संदर्भात फोन करू असे आश्वासने आताच्या लोकप्रतिनिधींनी निवडणूकी दरम्यान दिली होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या उसाला तोडणीसाठी अजूनही ऊस तोडणी टोळ्या मिळालेल्या नाहीत. मग राजकीय आश्वासन हे केवळ हवेतच असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तसेच तालुक्याचा कारभारी बदलला परंतू, प्रश्न मात्र तसेच आहेत. अशीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
शिकारीच्या शोधत असलेला बिबट्या कधी जेरबंद करणार?
तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या तीन महिन्यात मांडवगण फराटा व पिंपळसूटी या गावांत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर या भागात केवळ दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. या संबंधित परिसरात नरभक्षक बिबट्या आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झाले नाही. शिकारीच्या शोधत फिरत असलेला बिबट्या कधी जेरबंद करणार? की कारवाईच्या केवळ वल्गनाच ठरणार? बिबट्यांना पकडण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करू असे विद्यमान आमदारांनी सांगितले होते. अजूनही या भागात पुरेसे पिंजरे मिळाले नाहीत. मग अजून एखादा जीव गेल्यानंतर या भागाला पिंजरे मिळणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
तालुक्याचा कारभारी बदलला मात्र, तालुक्यातील विविध प्रकारच्या अनेक समस्या आहे तशाच आहेत. त्यामुळे आमदार साहेब आता तरी दिलेले शब्द पूर्ण करा, अशी म्हणण्याची वेळ शिरूरच्या पूर्व भागातील सर्व सामान्य जनतेवर आली आहे.