पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. सॉफ्टवेअर कंपनी दिवाळखोरीत गेल्याने देणी भागविण्यासाठी सावकाराकडून १० लाख रुपये घेतले, त्याने बँकेतून ८ लाख काढले, तर २ लाख रुपये व्याज म्हणून कापून घेतले. तब्बल ५५ लाख रुपये दिल्यानंतरही आणखी पैसे मागून, जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १० ऑगस्ट २०२३ ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये घडला आहे.
या प्रकरणी भुकूम येथील एका ४७ वर्षीय नागरिकाने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवि नरसिंग पवार (रा. हडपसर) व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सध्या एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून खराडी येथे काम करीत आहेत. त्यांनी एक सॉफ्टवेअर कंपनी २०१८ मध्ये सुरु केली. ती दिवाळखोरीत निघाल्यामुळे त्यांनी त्यांच्या गावाकडील शेती विकून कंपनीची काही देणी भागविली होती. फिर्यादीकडे पैसे शिल्लक नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रांकडे पैसे मागितले. मात्र, त्यांना कोणीही पैसे दिले नाहीत.
त्यावेळी एका व्यक्तीच्या ओळखीतून त्यांनी रवि पवार याच्याकडे १० लाख रुपये मागितले. त्याने बँकेमधून ८ लाख रुपये काढले. पण, फिर्यादी यांच्या हातात फक्त ६ लाख रुपयेच दिले. त्यातील २ लाख रुपये व्याज म्हणून काढून घेतले. दुसर्याच दिवशी पवार याने सांगितले की, दर महिना मी मागेल, तेवढे पैसे मला आणून द्यायचे.
दरम्यान, तू वेळेवर देशील याची मला खात्री नाही. तु तुझे एटीएम कार्ड मला दे, ज्या दिवशी तुझा पगार होईल, ते मी एटीएममधून काढून घेईन. पैसे फिटले की तुला तुझे कार्ड परत देईल, असे म्हणून तो कार्ड घेऊन गेला. त्यानंतर त्याने व त्याच्या इतर नातेवाईकांनी वेळोवेळी हजारो रुपये काढले. त्याच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांनी अनेकांच्या खात्यावर पैसे पाठविले.
मात्र, ६ लाखांच्या बदल्यात वेळोवेळी आरोपीला पैसे पाठवल्याने फिर्यादीने तब्बल ५५ लाख ७१ हजार रुपये दिले. तरी वेळेवर पैसे देता आले नाही, म्हणून रवि पवार याने फिर्यादीला मगरपट्टा येथे कामानिमित्त बोलावून घेतले. दरम्यान त्याने व त्याच्या चार साथीदारांनी बेदम मारहाण केली. मी सांगतो तेवढे पैसे दिले नाहीत, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारेल, अशी धमकी देखील दिली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण करीत आहेत.