पुणे- अल्पवयीन मुलगी पळवुन नेल्याच्या रागातुन, मुलीच्या वडीलांनी आपल्या आठ ते दहा सहकाऱ्यांच्या समवेत मुलीला पळवुन नेणाऱ्या मुलाची मावशी व तिच्या तेरा वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. विशेष बाब म्हणजे मुलीच्या वडीलांच्या एका मित्राने, अपहणानंतर मुलीला पळवुन नेणाऱ्या मुलाच्या तेरा वर्षाच्या मावस बहिनीवर लैंगिक अत्याचार (Attempt To Rape) कऱण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पिडीत मुलीच्या आईने केला आहे.
वरील धक्कादायक प्रकार पुण्यातील बोपोडी भागात पाच महिण्यापुर्वी घडला आहे. या प्रकरणी बोपोडी भागातील ३२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) या प्रकरणी तक्रार दिली आहे. खडकी पोलिसांनी मुलीचे वडील, चार महिला व त्यांचे अनोळखी चार ते पाच नातेवाईक अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता (नाव बदलले आहे) हे आपल्या सोळा वर्षाच्या मुलीसह बोपोडी परीसरात रहातात. तर त्यांच्याच नात्यातील कल्पना (नाव बदलले आहे) या महिला दत्ताच्या घऱाजवळ राहतात. मागिल मार्च महिण्याच्या पहिल्या आठवड्यात कल्पनाच्या बहिणीच्या मुलासोबत दत्ताची सोळा वर्षीय मुलगी घरातुन निघुन गेली.
मुलगी पळुन गेल्यानंतर, दत्ता व कल्पना यांच्या कुटुंबात मोठा वाद चालु झाला. या रागातुन दत्ता व त्याच्या घऱातील महिलांनी कल्पना व तिच्या तेरा वर्षाच्या मुलीला घरात शिरुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच, दत्ताने आपल्या कांही मित्रांच्या समवेत कल्पना व तिच्या तेरा वर्षाच्या मुलीचे अपहरण केले व दोघींनाही एका चारचाकी वहानातुन इंदापुर मार्गे अकलुजला नेऊन, त्या ठिकाणी कोंडुन ठेवले.
कल्पना व तिच्या तेरा वर्षाच्या मुलीला अकलुजमध्ये ठेवले असताना, दत्ताच्या अकलुजमधील एका मित्राने कल्पनाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच कल्पनाला व तिच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन मारण्याचा प्रयत्नही दत्ता व त्याच्या सहकाऱ्यांनी केला होता. मात्र त्याच दरम्यान पुण्याहुन एक फोन आल्याने, दत्ता व त्याच्या सहकाऱ्यांनी कल्पनाला व तिच्या मुलीला खडकी भागात आणुन सोडले.
हा प्रकार घडल्यानंतर कल्पना व तिच्या नातेवाईकांनी न्याय मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खडकी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असुन, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.