सुरेश घाडगे :
परंडा : परंडा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम मंगळवार(ता. २०) राबविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाजार मैदान या मुख्य मार्गावरील दुतर्फा झालेले अतिक्रमण जेसीबीद्वारे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. त्यामुळे हा मुख्य मार्ग रहदारीस मोकळा झाला आहे. याबाबत प्रशासनाचे कौतुक होत आहे.
परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन ते बाजार मैदानापर्यंतच्या मार्गावर दुतर्फा अतिक्रमण झाल्यामुळे रहदारीचा रस्ता अरुंद झाला होता. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात तर पदचारीना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागत होता. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने व रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्यामुळे अपघताचे प्रमाण वाढले होते.
दरम्यान, मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे व सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी आदीनी बेधडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या टपरी, हॉटेल, फळाचे दुकान आदीनी स्वतः आपले अतिक्रमण काढुन घेण्यास सुरुवात केली. परंडा ते करमाळा मार्गावर दुतर्फा अतिक्रमण करण्यात आले आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.