लोणी काळभोर, (पुणे) : महावितरणच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने मागील दोन दिवसांपासून पूर्व हवेलीतील आळंदी म्हातोबासह परिसर अंधारात आहे. रोहित्राची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीज कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही कोणी दखल घेत नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या सर्वत्र उन्हाळा तीव्र होत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वातानुकूलित यंत्र व पंखेही बंद पडल्याने नागरिक, व्यापारी तसेच शासकीय कर्मचारी प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाने दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. वाढत्या तापमानाबरोबर नागरिकांना सध्या जास्त वीज खंडित होत असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसाबरोबर रात्रीच्या वेळीही वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्व हवेलीत विजेची मागणी वाढल्याने भारनियमन करावे लागत आहे. सध्या एकीकडे 40 अंशाच्यावर तापमान गेल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले आहे. तापमान वाढीमुळे नागरिक एसी, कुलर, फॅनचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. त्यामुळे आपोआपच विजेची मागणी वाढली आहे. परंतु वाढत्या विजेच्या मागणीमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
दिवसा भारनियमन होत असतानाच आता रात्रीच्या वेळीही अचानकपणे भारनियमन सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी वीज गेल्याने लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींबरोबरच सामान्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उकाड्याबरोबरच रात्रीच्या वेळी वीज गेल्याने डासांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक बोलत आहे.
मागील दीड महिन्यांपासून उष्णतेची लाट वाढल्याचा अनुभव पूर्व हवेलीतील नागरिक घेत आहेत. परिणामी मेच्या सुरुवातीलाच पूर्व हवेलीतील तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचला आहे. पहाटेचे गार वारे आणि दिवसभरात वाढणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर एरव्ही शहरातील गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
रात्री विद्युत पुरवठा खंडित करू नये..
दिवसा भारनियमन केले तरी नागरिक त्यावर काहीतरी उपाय शोधून घराबाहेर, झाडाखाली बसून दिवस काढू शकतात. परंतु सध्या रात्री होणाऱ्या भारनियमनामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘घरातही बसू शकत नाही आणि बाहेरही पडू शकत नाही’ अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. त्यामुळे रात्री विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी नागरिक करीत आहेत.
विजेअभावी व्यावसायिक मेटाकुटीला..
वाढत्या उष्णतेच्या बसणाऱ्या झळा अन् त्यात ‘बत्ती गुल’ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, उरुळी कांचन, कोरेगाव मूळसह परिसरात मोठ्या प्रमाणात नर्सरी व्यावसायिक आहेत. त्या ठिकाणी असलेल्या नर्सरीसाठी पाणी आवश्यक असुन विजेअभावी देता येत नाही त्यामुळे परिसरातील नर्सरी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. तसेच मागील दोन दिवसांपासून पूर्व हवेलीतील तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे पोहचला आहे. त्यामुळे उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. अशातच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.
यासंदर्भात महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर एसी, पंखे, कुलरचा वापर वाढला आहे. त्यामुळे अचानक विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच वारंवार छोटे – मोठे छोटी मोठी कामे निघत असल्याने वीजपुरवठा काही वेळेसाठी खंडित होत आहे. मात्र तो तत्काळ जोडण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करीत आहेत.
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील बापू दळवी म्हणाले, “महिन्याच्या महिन्याला न चुकता वेळेवर लाईट बिल भरले जाते. दोन दिवस उशीर लागला तर लाईट कट केली जाते. मग वेळेवर वीजपुरवठा करायला नको का,परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महावितरण कंपनीने पर्यायी व्यवस्था म्हणून अजून एक रोहित्र वीज उपकेंद्रात बसवण्याची व्यवस्था करावी.”