पुणे : भारतीय जनता पक्षाला लोकनेते आवडत नाहीत. देशात भाजपने अनेक लोकांची ताकद कमी केली, त्यांनी त्यांच्याच नेत्यांचीसुद्धा ताकद कमी केली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल लिहून ठेवा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले. ते बारामती येथे बोलत होते.
अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली. 18 ते 22 जानेवारी दरम्यान कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन होणार आहे. या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातून लोक येत असतात. ज्या प्रमाणे शेतकरी येत असतात त्याच प्रमाणे राजकिय नेते देखील येत असतात. गुरुवारी आमदार रोहित पवारांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना येथे नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. उत्पन्न दुप्पट करायचा प्रयोग येथे होत आहे.