मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी रश्मी शुक्लांसह फडणवीसांवर टीका केली आहे. राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी मिळाली असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. आता अधिकृतपणे फोन टॅप होतील अशी बोचरी टीका खडसे यांनी केली आहे. शुक्लांवर खडसे यांचाही फोन टॅप केला असल्याचा आरोप होता.
एकनाथ खडसे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती होईल हे माहिती होते. त्यांनी माझा फोन टॅप केला होता. राज्याला पहिल्या पोलीस महासंचालक मिळाल्या आहेत. त्यामुळे आता महिला सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे खडसे यांनी म्हटले.
क्लोजर रिपोर्ट दाखल
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
फोन टॅपिंग प्रकरण
रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले, भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.