उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ईद-ए-मिलाद हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात रविवारी (ता. ०९) साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वेगवेगळ्या प्रकारात ३० मुलांना विविध बक्षिसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वधर्मसमभावाच्या भावना जपत हिंदू–मुस्लिम एक्य दिसून आले व सर्व समाजाचा हजारो नागरिक एकत्र दिसून आले.
दोन वर्षानंतर जुलूस मिरवणुक निघाली असल्याने भारताचा झेंडा अग्रस्थानी घेऊन गावातुन सुमारे हजारो जणांच्या सहभागाने प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची तयारी मुस्लिम बांधवांनी जोरदार केली होती. ईदनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन फरहान भाई मनियार, अजीज शेख, नईम अत्तार, सैफ मनियार, अमीर तंबोली, सुलतान सय्यद, मौला शेख, सलमान मनियार, अमन मणियार व मुस्लिम जमात उरुळी कांचनचे सर्व सदस्य आणि त्यांच्या सहका-यांनी केले होते. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिसांनी मिरवणुकीसह पुणे-सोलापूर महामार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बहुजन जनता दलाचे पंडित दाभाडे, बहुजन रिपब्लिक सेनेचे वसंत डेढे, लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, सामाजिक कार्यकर्ते शोएब मनियार, खलील शेख, शिवसेना उरुळी कांचनचे विभागप्रमुख श्रीकांत मेमाने, तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन आदी उपस्थित होते.