उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीत मागील आठ ते दहा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यास कृषी खात्याने व महसूल खात्याने तातडीने काम करावे असे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत कार्यालयातउरुळी कांचन व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठीची महसूल व कृषी खात्याबरोबरची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार पवार बोलत होते.
यावेळी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, तालुका कृषी अधिकारी एम. डी. साळे, मंडल कृषी अधिकारी गुलाबराव कडलक, कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर, पंचायत समिती हवेलीचे विस्तार अधिकारी अनिलकुमार बागुल, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कांचन सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, उरुळी कांचनच्या सर्कल नुरजंहा सय्यद, तलाठी सुधीर जायभाय, उरुळी कांचन पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी एम.डी साळे म्हणाले कि, हवेली तालुक्याच्या पूर्व भागात ३९५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. त्यापैकी ८५० हेक्टर क्षेत्र उरुळी कांचन परिसरात भाजीपाला व अन्य नगदी पिकाखाली येते. या परिसरात सुमारे ८० ते ८२ मिलिमीटर पाऊस मागच्या आठवड्यात पडल्यामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, भाजीपाला पिकाचे नुकसान देण्यासाठी ३३ ते ५० टक्के नुकसान जर झाले असेल तरच शासन नुकसान भरपाई देते.
या ठिकाणी झालेले नुकसान ५० ते ६० टक्के च्या दरम्यान असल्यामुळे शेतकरी या नुकसान भरपाईस पात्र ठरतील. शासनाने नुकसान भरपाईचे दरांमध्ये सुद्धा दुपटीने वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत करणार आहोत.
या बैठकीत उपस्थितांनी गुंठेवारीची नोंद ही फक्त हवेलीतच होत नाही. उरुळी कांचन ग्रामपंचायतला पाणीपुरवठा योजनेसाठी मिळणाऱ्या जागेच्या संदर्भातील प्रश्न,उरुळी कांचन गावातून जाणाऱ्या महामार्गावर पाणी साठून होणाऱ्या अपघाताचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न, त्याचप्रमाणे पीएमआरडीए या भागातून पैसे गोळा करते मात्र त्यातील काही निधी या भागातील विकास कामांना देत नाही.
दरम्यान, याची तक्रार, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचा प्रश्न, ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न, रेशन धान्य मिळत नाही तो प्रश्न, पाणंद रस्त्यांचा प्रश्न आमदार अशोक पवार यांच्यापुढे मांडले या सर्व बाबतीत आपण संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क साधून लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.