पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी मोहिनी वाघ हिला न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहिनी वाघ हिला 30 डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्याकडून गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले जात होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. शिवाय सरकारी वकिलांनीही अशाच पद्धतीने युक्तीवाद केला आहे.
मोहीनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्याकडून मागील वर्षावापासून सतिश वाघ यांच्या हत्येचा प्रयत्न सुरु होता, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे. मोहिनी वाघने अक्षय जवळकरला सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यात पाच लाख रुपयांची सुपारीची देवाण घेवाण झाली होती. या आर्थिक व्यवहाराचा तपास करायचा आहे. या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
सतीश वाघ यांच्या हत्येमागे नक्की कारण काय आहे ते शोधायचे आहे. खुनासाठी तीन हत्यारे वापरण्यात आलेली. त्यातील एक सापडले आहे. इतर दोन हत्यारे शोधायची आहेत. त्याबाबत आरोपी वेगवेगळी ठिकाणे सांगत आहेत. त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असंही पोलिसांकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे.
सुपारी देऊन पतीची हत्या..
पुण्यातील सतीश वाघ यांचा खून त्यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघ यांना काल अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाघ यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली.
सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जवळकर यांच्याशी असलेले संबंध यातून हा खून करण्यात आला आहे. अक्षय जवळकर हा वाघ यांचेकडे 15 वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहायला होता, यातून त्याची आणि मोहिनी वाघ यांच्याशी जवळीक झाली. दुसऱ्या बाजूला, सतीश वाघ हे मोहिनी यांना मारहाण करत होते. याच जाचाला कंटाळून मोहिनीने हे कृत्य करायचे ठरवले. या साठी 5 लाख रुपये हे अक्षय जवळकर यानेच इतर आरोपींना दिले असल्याचे समोर आले आहे. मात्र संपूर्ण कटामध्ये मोहिनी वाघ यांचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.