पुणे : रास्त भाव धान्य दुकानदार व ग्राहकांसाठी ई-पॉस मशीन डोकेदुखी ठरत असून, सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्याच्या व शिधापत्रिका धारकांना वेळेवर राशन मिळण्याच्या दृष्टीने ई-पॉस मशीन अद्यावत करणे गरजेचे आहे. दर महिन्याला रेशन दुकानात २० तारखेनंतरच धान्य मिळते. आता रेशनवर धान्य आले पण मशीन खराब आहे. मशिनवर अंगठा लावला तरी त्याची नोंदणी होत नाही. अशा तक्रारी रेशन कार्ड धारकांकडून केल्या जात आहेत. अनेक रेशन कार्ड धारकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.
ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार दिवसांपासून धान्य वितरणसुद्धा ठप्प आहे. याचा फटका गरीब नागरिकांना बसत आहे. राज्यातील रेशन दुकाने ई-पॉस मशीनवर रेशन कार्ड धारकांची बायोमेट्रिक नोंदणी करून धान्य वितरण करतात. परंतु नुकतंच ई-पॉस मशीनवर नवीन सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या वितरणातील त्रुटींमुळे रेशन दुकानांवर धान्य उशिराने उपलब्ध झाले. पुन्हा ई-पॉस मशीनवरील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. बायोमेट्रिक नोंदणी मशीनवर केली जाते. मात्र धान्य दिल्याची पोचपावती नाही. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पुणे शहर, जिल्हा आणि इतर अनेक शहरांमध्ये धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पुणे विभागातील रेशन दुकाने आयएसओ प्रमाणित आहेत. सर्व्हर डाऊन आणि सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होतच राहतो. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून नीट उत्तरे मिळत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.
दरम्यान, ई-पॉस मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने रेशनवरील धान्य वितरण चार दिवसांपासून ठप्प आहे. कोणीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्रशासकीय यंत्रणेत अशी परिस्थिती आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी दिली.