अजित जगताप
सातारा – कोणताही धर्म व धम्म हा मानवाच्या कल्याणासाठीच स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वधर्मीय संस्थापक हे आदरणीय आहेत. याची प्रचिती खटाव तालुक्यात तसेच हुतात्मा नगरी असलेल्या वडूज मध्ये पाहण्यास मिळाली. विविध ठिकाणी हजरत मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त ‘दुवा फतेहा’ साजरा करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, जावळी, मेढा, कुडाळ माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी व इतर गावात तसेच खटाव तालुक्यातील पुसेगाव, खातगुण, तडवळे, वर्धनगड, कातर खटाव, पुसेसावळी,औंध, मायणी, डिस्कळ, गोपूज, निमसोड, निढळ,मांडवे, कुमठे, नांदोशी, हिंगणे, डाळमोडी,एनकुळ आदी गावात ईद- ए- मिलाद साजरी करण्यात आली.
तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध गावात मशीदीत नमाज अदा केली. वडूज मुस्लिम जमात यांच्याकडून बिरादरी, बागवान ,पठाण, शिकलगार, मुल्ला, शेख, डांगे, नदाफ, पिंजारी, आत्तार ,माणेर, काजी, सय्यद व मान्यवरांनी वडूज येथील मशीद येथून बाजार प्रांगणात जुलूस काढण्यात आला.त्यानंतर बदाम, काजू मिश्रित दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ महेश गुरव, रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष गणेश भोसले,रा स प चे श्रीकांत देवकर, जेष्ठ पत्रकार अजित जगताप,सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव, सुनिल मिसाळ,दत्ता केंगारे,डॉ वैभव माने, आप्पासाहेब गोडसे, सौ राणी विकास काळे व मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आदरणीय इस्लाम धर्म संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर हे वयाच्या ४० व्यावर्षी प्रेषित्व प्राप्त झाले. तथापि,लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू होता. लहानपणीच आई-वडिलांची छत्रछाया हरवली. आजोबा व चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांच्यासोबत त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने प्रवास व भटकंती केली. त्यांनी तरुणपणीच आपल्या नैतिक चारित्र्य व आचरणाने ‘अलअमिन’ (विश्वासू) म्हणून सन्मान प्राप्त केला होता. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता व अभ्यासूवृत्ती होती.त्यांचे मन समाजाप्रती दया आणि करुणेने ओतप्रोत भरलेले होते. ‘हिरा’डोंगराच्या गुफेमध्ये ते चिंतन करीत होते.
दिव्य ज्ञानाच्या स्फुल्लिंगाने एक निश्चित ध्येयासाठी हजरत मुहम्मद पैगंबराच्या कार्याला सुरुवात झाली. सच्चा, प्रामाणिक व कर्तव्य निर्धाराने सत्य, न्याय व नीतीच्या दीन (धर्म) इस्लामची प्रतिष्ठापना त्यांनी केली. आज जगभर इस्लाम धर्म अनेकांनी स्वीकारला आहे. त्याची ही माहिती जाणकार मंडळींनी दिली. आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी फळ व सरबत व दुध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.