-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा समजल्या जात असलेल्या सासवड येथील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होऊन चार ते पाच महिने होत असतानाच या इमारतीत धुळीचे साम्राज्य दिसू लागले आहे. इमारतीच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टापटीपपणा आणि स्वच्छतेबाबत सूचना करूनही त्यांच्या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चुन पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी बांधलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन 26 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. अजित पवार यांनी उद्घाटन केल्यानंतर तब्बल एक तास इमारतीच्या सर्व भागांची पाहणी करून कामकाज व डिझाईनमधील त्रुटी निदर्शनास आणून, नाराजी व्यक्त केली होती. आवश्यक सुधारणा करण्यास सांगून इमारतीच्या स्वच्छता व टापटीपपणाबाबत नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या.
कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना झाडांच्या सावलीची लवकरात लवकर व्यवस्था व्हावी, याकरता इमारतीच्या चहुबाजूने चांगल्या उंचीची झाडे लावण्याबाबतही सूचना केल्या होत्या. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या या सूचनांकडे प्रशासनाने सोयीस्कर कानडोळा केल्याचे इमारतीतील धुळीवरून दिसत आहे. इमारतीत सध्या काही ठिकाणी काम चालू असलेल्या फर्निचरच्या कामाच्या ठिकाणी धूळ असणे नागरिक समजून घेऊ शकतात. मात्र इतरत्रही मोठ्या प्रमाणावर धूळ दिसत असल्याने सासवड (ता. पुरंदर) कर्मचाऱ्यांनी पान, गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या दिसून येत आहे.
नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. नागरिकांना बसण्यासाठी असणाऱ्या खुर्च्यांवरही धूळ व पाखरांची विष्ठा अनेक ठिकाणी दिसत आहे. या धुळीमुळे चार ते पाच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेली इमारत जणू काही चार वर्षांपूर्वीपासून कामकाज चालू असल्याप्रमाणे जाणवत आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी बसत असलेल्या खिडक्यांच्या बाहेर पान, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे इमारतीतील कचरा एका कोपऱ्यामध्ये अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेला आहे. इमारतीच्या परिसरात झाडे लावण्याबाबत अजित पवार यांनी सूचना करूनही फक्त सुपा-सासवड रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भिंतीलगत आतील बाजुने लहानशी झाडे लावलेली आहेत.
दरम्यान, याबाबत तहसीलदार विक्रम राजपूत यांना संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सासवड (ता. पुरंदर): प्रशासकीय इमारतीच्या कोप-यात जमलेला कचऱ्याचा ढीग. मुख्य प्रवेशद्वार केव्हा उघडणार? इमारतीत येण्याकरता सुपा-सासवड रस्त्याला लागून एक मुख्य प्रवेशद्वार व पूर्व बाजूने दुसरे प्रवेशद्वार आहे. सध्या मुख्य प्रवेशद्वार इमारतीच्या उद्घाटन प्रसंगानंतर वाहनांना ये-जा करण्यासाठी बंदच आहे. यामुळे पूर्वेकडील दुसऱ्या प्रवेशद्वाराने वाहने आत येऊन मुख्य रस्त्यावर येत आहेत. या ठिकाणी जागेवर असणाऱ्या वळणामुळे अपघाताची शक्यता आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या लगत प्रशस्त जागा असल्याने येथून वाहने ये-जा करताना अडचण येणार नसल्याने हे प्रवेशद्वार नक्की उघडणार तरी कधी, असा सवाल नागरिक करत आहेत.
‘अजित पवार अचानक भेट देणार’
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने काम करत असतात. यामुळे अधिवेशनातील कामकाजातून निवांत झाल्यानंतर अचानक केव्हाही या इमारतीची व परिसराच्या स्वच्छतेची पाहणी करतील, असे राष्ट्रवादीच्या एका जबाबदार नेत्याने सांगितले.
कार्यालय व परिसरातील स्वच्छतेसाठीचा लवकरच ठेका देण्यात येणार आहे. आवश्यक तितकी स्वच्छता राखण्याचे काम निश्चित केले जाईल. आवश्यक ती सुरक्षारक्षकांची व्यवस्था झाल्यानंतर दोन्ही प्रवेशद्वारे खुली ठेवली जातील.
-वर्षा लांडगे, प्रांताधिकारी.