नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवा ट्विस्ट समोर येत आहे. आजपासून निवडणुकीतून माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार किशोर दराडे यांचे नाम साधर्म्य असणारे किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांचे नाम साधर्म्य असणारे संदीप नामदेव गुळवे यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी 36 उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आता माघारीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून नाम साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान होणार आहे.
अपक्ष उमेदवार संदीप गुळवे या उमेदवाराने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराने संदीप गुळवे या उमेदवाराला राज्याबाहेर नेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. एवढंच नाही तर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तावडीतून संदीप गुळवे यांना सोडवून आणले आहे, असा दावाही ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे तर, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून धुळ्यातील महेंद्र भावसार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.
तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेसने दिलीप पाटील यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतदेखील फूट पडण्याची शक्यता आहे. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात चांगलीच चुरस वाढल्याचे दिसून येत आहे.