मुंबई: भारतीय क्रिकेटच्या 2024-25 देशांतर्गत हंगामाची सुरुवात 5 सप्टेंबर रोजी दुलीप ट्रॉफीने होणार आहे. टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळताना दिसणार आहेत. यातील काही खेळाडू भारतीय कसोटी संघात पुनरागमनाकडे डोळे लावून बसले आहेत. यामध्ये स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे. मात्र दुलीप ट्रॉफीपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नशिबाने दगा दिला आहे. सध्या कसोटी संघात त्याच्या पुनरागमनाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत.
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीच्या प्राथमिक फेरीतून बाहेर पडला आहे. गेल्या आठवड्यात कोईम्बतूर येथे बुची बाबू स्पर्धेत मुंबईसाठी प्री-सीझन सामन्यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप सावरू शकलेला नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमारला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून तो सध्या नियमित तपासणीसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहे.
बुची बाबू स्पर्धेत मुंबई आणि टीएनसीए इलेव्हन यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारच्या हाताला दुखापत झाली. यानंतर त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावातही फलंदाजी केली नाही. सूर्यकुमारने नुकतीच भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशा स्थितीत त्याची नजर दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्यावर होती. या कारणास्तव, स्वतःला तयार करण्यासाठी, त्याने प्री-सीझन बुची बाबू स्पर्धेसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले. मात्र, या दुखापतीने त्याच्या पुनरागमनाच्या आशा काही काळासाठी धुळीस मिळवल्या आहेत.
सूर्यकुमार यादवला नुकतेच T20 चे कर्णधार बनवण्यात आले आहे, कारण या फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र, आतापर्यंत त्याला कसोटीत केवळ 1 सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळला होता. या सामन्यात त्याला केवळ 8 धावा करता आल्या. यानंतर त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.