पुणे – पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लहान – मोठ्या टोळ्यादेखील चांगल्याच सक्रिय झालेले दिसून येतात. या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पुण्यातील गुन्हे शाखेचे प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जीवापार प्रयत्न करत असतात. याच पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र बक्षिस म्हणून मात्र १०० रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर पोलिस उपायुक्तांच्या गाडीच्या ड्रायव्हरला २१ हजारांचे बक्षीस जाहीर झाल्याची यादी समोर आली आहे. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.
यंदाच्या गॅझेट लिस्टमध्ये परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे ड्रायव्हर आणि गार्ड म्हणून नियुक्त असलेल्या चार पोलिस शिपायांना तब्बल २१ हजार रूपये प्रत्येकी इतके रिवॅार्ड देण्यात आले आहेत. गायकवाड यांना वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांना हा रिवार्ड जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे परिमंडळ तीनच्या उपायुक्त मीटींगला वेळेवर पोहोचवले म्हणून हजारो रूपयाची बक्षीसांची खैरात करत आहेत. मात्र गंभीर गुन्ह्यामधले गुन्हेगार जीवावर उदार होऊन पकडून आणणाऱ्यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फक्त १०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस अनेकदा जीवाची बाजी लावतात. आपल्या गुप्त सूत्रांना कामाला लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात. अनेकदा माहिती मिळाल्यावर रात्रीबेरात्री गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रवाना होतात. तर अनेकदा तातडीने सापळा रचून गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवतात. चोरी, खून, अपहरण या प्रकरणातील कोयते, चाकू सुरी यांचा शोध घेण्यासाठी जीवावर बेतून कार्यरत असतात. पुणे पोलिसात दुजाभाव करत अशाप्रकार देण्यात आलेल्या रिवॉर्डमुळे त्यांच्या कामाची एकप्रकारे ही थट्टा तर नाही ना? असा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत.