उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत चार ते पाच दिवसापासून फिरत असलेल्या एका मुलीला अष्टापूर गावच्या सरपंच कविता जगताप यांच्या सतर्कतेमुळे सदर मुलगी सुखरूप नातेवाईकांना मिळाली आहे. सरपंचाच्या तत्परतेमुळे मुलगी सुखरूप मिळाल्याने नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या या कार्यामुळे अष्टापूरसह उरुळी कांचन परिसरात त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी परिसरात दोन-तीन दिवसांपासून अनोखळी मुलगी भटकत असल्याची माहिती अष्टापूर गावाच्या सरपंच कविता जगताप यांना मिळाली होती. कविता जगताप यांनी स्वतः मुलीचा शोध घेतला.
सदर मुलगी मिळाल्यानंतर तीची आस्थेने विचारपूस करत जेवणाची व्यवस्था केली. परिसरात भटकत असल्याने तिच्या पायाला जखमा झाल्या होत्या. त्यावर प्राथमिक उपचार करून विचारपूस केली. सदर मुलीची माहिती शेजारच्या गावात तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वाना माहिती दिली होती. त्यानुसार सदर मुलगी हि सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तनगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीच्या नातेवाईकांना मोबाईल फोनद्वारे संपर्क करून त्यांना सदर गोष्टीची माहिती दिली. त्यानुसार सदर मुलीचे नाव हे रेश्मा बबन काळे असल्याचे समजले. त्यानुसार सरपंच जगताप यांनी मुलीचे वडील बबन काळे व तिचा भाऊ राकेश काळे यांना मोबाईल फोनवरून माहिती दिली.
यावेळी राकेश काळे यांनी सांगितले कि दहा ते बारा दिवसापासून रेश्मा हि घरातून बेपत्ता झाली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार दिली होती. यावेळी राकेश काळे व मुलीचे वडील बबन काळे अष्टापूर या ठिकाणी आले व रेश्माला सरपंचानी त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी काळे कुटुंबीयांनी जगताप यांचे कौतुक करीत आभार मानले.
याबाबत अष्टापुरच्या सरपंच कविता जगताप म्हणाल्या, “सदर मुलीला तिच्या नातेवाईकांकडे दिल्याने समाधान मिळाले आहे.”