दौंड (पुणे) : राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. आघाडीला अपयश पचवता येईना म्हणून ते चुकांवर पांघरूण घालत आहेत. भाजपच्या यशामुळे आघाडीचे नेतेमंडळी सैरभैर झाली आहेत. कार्यकर्ते सत्तेच्या विरोधात फार काळ संघर्ष करू शकत नसल्याने ते भाजपशी जवळीक साधू लागले आहे. त्यांच्या मनात चिलबिचल चालू आहे. ईव्हीएमची विश्वासार्हता माहित असूनही केवळ कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील आघाडीची जानकार नेते मंडळीसुद्धा ईव्हीएमवर अपयशाचे खापर फोडत आहेत. याचे आश्चर्य वाटत आहे. अशी खरमरीत टिका दौंड तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
तेव्हा ईव्हीएम चांगले होते…: हरिश्चंद्र ठोंबरे
ठोंबरे प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणतात की, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी १९९९, २००४, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या. त्यात त्यांना बहुमत मिळाले. तेव्हा मतदान यंत्र चांगले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात महायुतीचे एकमेव राहुल कुल वगळता सर्व आमदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विजयी झाले होते. तेव्हा ईव्हीएम चांगले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला अनपेक्षित विजय मिळाला आहे. तेव्हा ईव्हीएम चांगले होते.
वायनाडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम चांगले होते. पंजाब व जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. तेव्हा ईव्हीएम चांगली. सुप्रियाताई सुळे खासदार झाल्या तेव्हा ईव्हीएम चांगले. अरे काय चालले आहे. मतदारांना तुम्ही मुर्ख समजता का? शहाण्या मतदारांनी तुमचा करेक्ट कार्य़क्रम केलेला आहे. असेही हरिश्चंद्र ठोंबरे म्हणाले.
या सर्व वागण्यावरून महाविकास आघाडीची कीव करावी वाटते. ज्या नेत्यांनी एके काळी देशाचे, राज्याचे नेतृत्व केले अशा जाणकार नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घ्यावा ही खेदाची बाब आहे. ईव्हीएम कथित घोटाळ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटकारले असले तरी जीव जाईना म्हणून हातपाय खोडायची वेळ महाविकास आघाडीवर आली आहे. अशीही टीका ठोबरे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
विकासाच्या योजनांमुळे महायुतीला राज्यात मोठे यश..
मुख्यमंत्री लाडकी बहीण, कृषी पंपाचे वीज बिल माफ, शेतकरी सन्मान योजना, शेती कर्ज माफी, घरकुल योजना, आरोग्य सुविधा अशा वैयक्तिक योजनांबरोबर दिर्घकालीन विकासाच्या योजनांमुळे महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात गोळा उठला आहे. पक्षांचे व नेत्यांचे आस्तीत्व टिकवण्यासाठी मविआची ही कोल्हेकुई चालू आहे. मतदार राजा हा सुज्ञ असून महाविकास आघाडीने ही कोल्हेकुई चालूच ठेवली तर त्यांचे उरलेसुरले मतदार देखील कमी होतील. असेही ठोंबरे यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीने रडगाणं बंद करावे..
दौंडचा विचार केला तर आमदार राहुल कुल यांनी तालुक्याचे पुढील ५० वर्षांचे व्हिजन मतदारांपुढे मांडले आहे. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी येणार ( २२०० कोटी ), हडपसर ते बोरीभडकपर्यतचा सहापदरी उड्डाणपूल ( सहा हजार कोटी रूपये ), मुळशीचे धरणातील पाणी आणणार, प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय सुरू केले. क्रीडा संकुल, नवीन वीज उपकेंद्र ( १७५ कोटी ), रेल्वेवरील खामगाव,सहजपूर येथील उड्डाणपूल, बेबी कालवा अस्तरीकरण ( ३०० कोटी रू. ) अशी कितीतरी कामे सांगता येतील. या विकासकामांना मतदारांनी पसंती दिली आहे. फरक स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने रडगाणं बंद करावे. अशी टीका ठोंबरे यांनी केली आहे.