लहू चव्हाण
पाचगणी : शुक्रवारी (ता. २१) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाच्या अस्मानी संकटाने स्ट्रॉबेरी शेती पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहीले आहे . तसेच वाटाणा आणि बटाटा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.
परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची लागवड करताना मोठ्या अडचणीना समोरे जावे लागली. मात्री काही शेतकऱ्यांनी अद्याप लागवड केली नाही. बऱ्याचदा दिवाळीत स्ट्रॉबेरी विक्रीचा शुभारंभ अनेक शेतकरी करतात. परंतु यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली अजूनही काही शेतकरी लागवड करीत आहेत.
मुसळधार झालेल्या पावसाने स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपूरी , आंब्रळ, मेटगुताड, पांगारी परिसरात स्ट्रॉबेरी शेतीत पाणी साचलेने शेतकरी हंगामापूर्विच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या शेतकरयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, खिंगर , गोडवली गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केली. यावेळी खिंगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठ्ठल दुधाने,अशोक दुधाने, शंकरराव कळंबे, सुभाष कासूर्डे व शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजेंद्र राजपुरे यांनी केली आहे
गोडवली येथील नितीन मालुसरे यांच्या शेतीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या बंगल्याची संरक्षक भिंत पाण्याने कोसळून सर्व पाणी शेतात घुसले. त्यामुळे मालुसरे यांच्या स्ट्रॉबेरीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे सबंधित मालकाने मालुसरे यांना भरपाई द्यावी अशी मागणी मालुसरे यांनी केली आहे.