सागर जगदाळे
भिगवण : भिगवण ग्रामपंचायत हद्दीत प्रवेशद्वारावर ठिकठिकाणी बसणाऱ्या फळभाजी विक्रेत्यांची ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने विनंती करून विक्रेत्यांना सिमेंट कट्ट्यावर बसून माल विकण्यास सांगितले. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांनी पदाधिकाऱ्याच्या शब्दाला मान देत बाजार मैदानातील सिमेंट कट्ट्यावर बसून फळभाजी विक्रेत्यांनी माल विकला. त्यामुळे भिगवण रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भिगवण ग्रामपंचायत हद्दीत दर आठवड्यातील रविवारी बाजार भरतो. या बाजारात परिसरातील मदनवाडी, तक्रारवाडी, डिकसळ व भादलवाडी या गावांसह आसपासच्या गावातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी व भाजीपाल्याचे व्यापारी आपला शेतमाल विकण्यासाठी भिगवणला येतात. शेतमाल विकण्यासाठी ग्रामपंचायत भिगवण यांच्याकडून सिमेंटचे कट्टे बांधण्यात आले आहेत. परंतु शेतकरी या कट्ट्यांचा वापर न करता बाजाराच्या दोन्ही प्रवेशद्वारा समोरच आपला शेतमाल विकत बसत होते. त्यामुळे बाजारात प्रवेश करतानाच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.
या गर्दीचा त्रास बाजारात येणाऱ्या महिलांना होत होता तर गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर महिलांचे दागिणे, मोबाईल व पैसे चोरत होते. तसेच बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही आपल्या दुचाकी पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्यामुळे दूरवर आपल्या गाड्या पार्किंग कराव्या लागत होत्या. त्यामुळे दुचाकी चोरीच्या घटनाही घडत होत्या. व्यापारी आपली मोठी वाहने कट्ट्यावर पार्किंग करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना बाकीच्या शेतकऱ्यांना जागा शेतमाल विकण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या सर्व समस्यांचा भिगवण ग्रामपंचायतीने गांभीर्याने विचार करीत तोडगा काढण्याचे ठरविले.
त्यानुसार रविवारी (ता. ०७) सकाळपासूनच भिगवण ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य गुराप्पा पवार व अमित वाघ हे भिगवणच्या आठवडे बाजाराच्या प्रवेशद्वारावर उभे राहिले. शेतकऱ्यांना आपला माल सिमेंट कट्ट्यावर बसून विकण्यासाठी विनंती करीत होते व आपली चारचाकी वाहने सिमेंट कट्टयावर पार्क न करता पार्किंग झोन मध्ये पार्क करण्यासाठी विनंतीही करीत होते. शेतकरी वर्ग ही त्यांच्या विनंतीला मान देऊन सहकार्य केले.
दरम्यान, पहिल्यांदाच प्रवेशद्वारांवर गर्दी झाली नाही. महिलांनाही बाजारात प्रवेश करते वेळेस कोणताही त्रास झाला नाही. ग्राहकांनाही आपली वाहने पार्क करण्यासही पुरेशी जागा उपलब्ध झाली. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने भिगवण आठवडे बाजार शिस्तीत भरल्याचे चित्र पाहायला मिळाले व खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनीही समाधान व्यक्त केले.
भिगवण ग्रामपंचायतीचे सदस्य गुराप्पा पवार म्हणाले, “यापुढेही भिगवणचा आठवडे बाजार शिस्तबद्ध पद्धतीने भरण्यासाठी उपाययोजना भिगवण ग्रामपंचायत मार्फत प्रयत्न सुरू राहणार आहेत. त्यासाठी सर्व शेतकरी, व्यापारी वर्ग यांनी भिगवण ग्रामपंचायतला सहकार्य करावे. त्यामुळे महिला भगिनींना होणारा त्रास नक्कीच कमी होणार आहे. चोऱ्यांच्या प्रमाणात ही नक्की घट होऊन सर्वांना या उपाययोजनांचा फायदा होईल.