राहुलकुमार अवचट
यवत : खुटबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अचानक बंद झाल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली आहे. शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास लडकतवाडी येथील रहिवासी आणि ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते रमेश लडकत हे पाय दुखत असल्याने प्राथमिक उपकेंद्र खुटबाव येथे गेले होते. त्यावेळी रुग्णालय बंद असल्याने अनेक रुग्ण उपचाराविनाच निघून जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे दवाखाना बंद होता. यावेळी लडकत यांचे संतुलन बिघडल्याने मानसिक त्रास झाल्यामुळे झोपून राहण्याची वेळ आली. या प्रकरणाची आरोग्य संचालक पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, तुषार झेंडे व प्रमोद शितोळे यांच्या माध्यमातून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी कर्मचारी यांची तातडीने केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तर डॉ. बापू झिटे यांनी लडकत यांना घरपोच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.
यावेळी बोलताना लडकत म्हणाले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडे व तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा तातडीने मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत केडगाव येथील आरोग्य अधिकारी नीलिमा लोखंडे यांच्याशी संपर्क साधला यावेळी त्या म्हणाल्या, रुग्णालय परिसरात “रुग्णालय बंद” असलेला कोणताही फलक लावण्यात आला नाही. तर रुग्णालयात एकूण चार जणांचा स्टाफ असून सध्या दोन पदे रिक्त आहेत. सध्या दोन कर्मचारीपैकी एक जण लसीकरणासाठी भांडगाव येथे तर एक जण दौंड येथे गेल्याचे त्यांनी सांगितले.