हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : वळती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घाटमाथ्यावर मंगळवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने वळतीसह आसपासच्या परिसरातील शेतीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो एकरावरील पिक वाहून गेले असल्याने भाजपा पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप व उरुळी कांचन येथील भाजपाचे शहराध्यक्ष अमित कांचन यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंडळाधिकारी व तलाठ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
वळती गावाच्या हद्दीतील घाटमाथ्यावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेजुरी बाजूकडून अचानक ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तासभर पडला. वळती गावाच्या हद्दीतील हजारो एकरात पाणीच-पाणी झाल्याचे दिसून आले. त्यातच डोंगरातून येणारे पाण्याचे लोट वळती गावाच्या परिसरातील चार छोट्या तलावात शिरल्याने, पाण्याच्या रेट्यामुळे चारही तलावाचे भराव वाहून गेले. यामुळे वळती परिसरात एकच हाहाकार उडाला.
डोंगरातून येणारे पाणी वळती गावाजवळील तलावात जमा होऊ लागल्याने पोलीस पाटील मोहन कुंजीर, किरण कुंजीर, शिवाजी कुंजीर, संतोष घोलप, काका कुंजीर, राजाराम कुंजीर यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना जागृत करीत उरुळी कांचनच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी चालले असल्याची माहिती तत्काळ दिली. त्यानुसार दहाच मिनिटात सर्वत्र माहिती मिळाल्याने उरुळी कांचनसह परीसरात ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. तसेच शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतकरी जगदीश महाडिक व गुरुनाथ मचाले यांनीही नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
वळती गावाच्या हद्दीतील ९०० हेक्टर पैकी साधारण ४०० हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे अधिक क्षेत्रावरील फळबागा, कांदा, तरकारी अशा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे पावसामुळे वळती गावाच्या हद्दीतील चार छोटे-बंधारे फुटल्याने, पावसाचे पाणी शिंदवने मार्गे उरुळी कांचन शहरात शिरल्याने उरुळी कांचन शहरात रविवारी मध्यरात्रीपर्यंत पाण्याने थैमान घातले होते. त्यामुळे उरुळी कांचन शहरातील काही रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
दरम्यान, ढगफुटी सदृश्य पावसामुळे वळती व परिसरातील तीन हजार एकरांहून अधिक शेतीमधील पिके पाण्यामळे वाहुन गेली आहेत. तर फळबागाचेही अतोनात नुकसान झाले आहे. तरकारी, कांदा यासारखी नगदी पिके पुर्णपणे वाहुन गेली आहेत तर, वळती परिसरातील पावसाचे पाणी शिंदवने परिसरात शिरल्याने, शिंदवने व उरुळी कांचन परिसरातील शेतीचेहि मोठे नुकसान झाले आहे.
वळती परिसरात झालेल्या पावसाचे पाणी शिंदवने मार्गे उरळी कांचन शहरात अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन शहरात शिरले. उरुळी कांचन शहरातून वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण झाल्याचा फटका उरुळी कांचन शहरवाशियांनी चांगलाच अनुभवला. ओढ्यावर झालेल्या अतिक्रमामुळे ओढ्यातून पाणी जाण्यास पुरेशी जागा नसल्याने, ओढ्यातील पाणी शहरात शिरले. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच ग्रामस्थांची काळजी घेतली होती.
उरुळी कांचन शहर जलमय, ओढ्यावर अतिक्रमण झाल्याचा मोठा फटका..!
वळती व डाळींब (ता. दौंड) या दोन गावाच्या हद्दीतील डोंगरात उगम पावणारे दोन ओढे उरुळी कांचन शहरात एकत्र होऊन, दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात. डाळींब परिसरातून आलेला ओढा पांढरस्थळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाच्या खालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. तर वळतीहून निघालेला ओढा शिंदवने मार्गे जेजुरी रस्त्याजवळून व पुणे-सोलापुर महामार्गाखालून सायरस पुनावाला शाळेजवळ येतो. सायरस पुनावाला शाळेजळ दोन्ही ओढे एक होऊन, रेल्वेखालील मोऱ्यातून दत्तवाडी, भवरापुर मार्गे मुळामुठा नदीला जाऊन मिळतात.
दरम्यान वरील दोन्ही ओढ्यावर, ओढ्यालगतच्या रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेली आहेत. पंचवीस वर्षापूर्वी शंभर फुटाहून अधिक रुंदी असलेले ओढे, सध्या दहा फूटीचे रुंदीचेही उरलेले नाहीत. ओढ्यालगत अनेक व्यावसायिकांनी दुकान, टपऱ्या टाकून अतिक्रमण करुन पुर्णपणे वेढले आहे. यामुळे वळती व डाळींब भागातील घाटमाथ्यावर थोडाफार पाऊस झाला तरी, उरुळी कांचन शहरातील रस्ते व दुकाने पाण्याखाली हे समीकरण ठरलेले आहे. मंगळवारी पावसाचे पाणी ओढ्यात मावत नसल्यानेच, पाणी इंदिरानगर, उरुळी कांचन शहरातील बाजारपेठ, बाजारमैदानात शिरल्याने हाहाकार उडाला होता. यामुळे ओढ्याकाठच्या हजारो नागरीकांना रात्र जागून काढावी लागली.
उरुळी कांचन जलमय होण्याची प्रमुख कारणे..!
-वळती व डाळींब (ता. दौंड) गावातुन येणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेली अतिक्रमणे.
-शहरातून वाहणाऱ्या ओढ्यांची रुंदी शंभर, सव्वाशे फुटावरुन दहा ते पंधरा फुटावर येणे.
-ओढ्यात कचरा टाकणे,
-ओढ्यात बांधकामाचा राडारोडा टाकणे
-ओढ्यावर बांधलेल्या पुलांची उंची पुरेशी नसणे, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणे.
-पावसाळ्यापुर्वी ओढ्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास ग्रामपंचायतीची टाळाटाळ.
-ओढ्यात वाळू धुण्यासाठी वॉशिंग सेंटर उभी राहिल्याने, वाळुमधील गाळ ओढ्यात येऊन, ओढे पॅक होणे.