पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता वैमनस्यातून सराईतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील भवानी पेठेत परिसरातील कासेवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी सराईतांसह साथीदारांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अजय हरिसिंग परदेशी (वय-४४), जय अनिल परदेशी (वय-२१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सादिक महंमद शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), नूर नजीर शेख, इरफान शेख (दोघे रा. नाडेगल्ली, गणेश पेठ), सलीम कासीम तांबोळी, इम्रान उर्फ इम्मू सत्तार शेख (दोघे रा. कोंढवा) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनू उर्फ माँटी अनिल परदेशी (वय २७, रा. म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. बुधवारी मध्यरात्री आरोपींनी सोनू परदेशी याचे काका अजय आणि लहान भाऊ जय यांना कासेवाडी भागात अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी काका आणि लहान भावाला सोडविण्यासाठी गेलेला सोनू याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या डोक्यावर देखील कोयत्याने वार केले. आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, पोलीस आरोपींंचा शोध घेत आहेत.