-राहुलकुमार अवचट
यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मतभारी वस्ती फाटा येथे असलेल्या दुभाजकावर वारंवार अपघात घडत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील फाट्यावर अपघात घडल्याने स्थानिक तरुणांनी सुमारे एक तास महामार्ग रोखून धरला.
पुणे सोलापूर महामार्गावरील मलभारेवस्ती फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने बनविण्यात आलेल्या दुभाजकामुळे रोजच अपघात होत आहे. बुधवारी (दि. 29 डिसेंबर) रोजी रात्री 9 च्यासुमारास याच दुभाजकावर अंदाज न आल्याने पुन्हा एक कार दुभाजकावर गेली. या गाडीत असलेल्या पती-पत्नी व लहान मुले यांना अपघातामुळे किरकोळ जखमा झाल्या असून प्रत्यक्षदर्शी यवतचे सरपंच समीर दोरगे त्यांनी तात्काळ प्रशासनाला फोन करून याबाबत माहिती दिली.
यावेळी महामार्ग प्रशासन घटनास्थळी येण्यापूर्वी गावातील अनेक तरुण अपघात झालेल्या ठिकाणी जमा होत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळपास तासभर रोखून ठेवला. यवत पोलिसांनी देखील रस्ता मोकळा करा असे आवाहन केले, परंतु तरुणांनी जवळपास तासभर ते मान्य केले नाही. अखेर सरपंच समीर दोरगे यांनी मध्यस्थी करत सर्व तरुणांना रस्त्यावरून बाजूला केले व रस्ता मोकळा केला. पाटस टोल प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा पुन्हा रस्ता रोको करू, अशी मागणी तरुणांनी यावेळी केली.