पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधील माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार वाद झाला.या वादाची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शेळके हे दुपारी सुमारे तीनच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी तिथे सुनील गुजर उपस्थित असलेले दिसताच आमदार संतापले आणि त्यांनी गुजर यांना एका खोलीत नेले. तेथे गुजर यांची बॅग तपासून पाहिली असता, त्यात शेळके यांच्याशी संबंधित काही कागदपत्रे सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुनील गुजर यांच्या दाव्यानुसार, आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळजबरीने खोलीत नेऊन मारहाण केली तसेच बॅग हिसकावून घेतली. तर दुसऱ्या बाजूला, आमदार सुनील शेळके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “गेल्या वर्षभरापासून गुजर माझ्यावर पाळत ठेवत असून भलत्याच व्यक्तीच्या नावाने अर्ज करून माझी वैयक्तिक माहिती मिळवत आहेत. ही गोपनीय माहिती ते विरोधकांना व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पुरवत आहेत,” असा उलट आरोप शेळके यांनी केला आहे. पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बंडगार्डन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये गुजर यांना खोलीकडे घेऊन जाईपर्यंत आमदारांनी त्यांना हात लावल्याचे दिसत नाही. शिवाय, ज्या खोलीत मारहाणीचा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे, तिथे कॅमेरा उपलब्ध नसल्याने मारहाणीचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पोलीस दोन्ही तक्रारींच्या आधारे अधिक तपास करत आहेत.






