पुणे : ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाचे हे तिसरे वर्ष असून, डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे शनिवारी (दि. ४ जानेवारी) सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान उच्च न्यायालय, मुंबईचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस फोर्स-१, मुंबईचे कृष्ण प्रकाश आणि कल्याणी टेक्नोफोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रुपये ५१ हजारांचा धनादेश असे आहे.
पुरस्काराबाबत सप्तसिंधूच्या अध्यक्षा ममता सपकाळ म्हणाल्या, की माईच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.