पुणे : भीम अनुयायांनी लावलेल्या पाच हजार लखलखत्या दिव्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा परिसर उजळून निघाला. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समितीच्या वतीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाच हजार दिवे प्रज्वलित करून अनोखे अभिवादन केले.
ज्येष्ठ साहित्यिक व माजी समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पहिला दिवा प्रज्वलित करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली. प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, एम. बी. वाघमारे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, असित गांगुर्डे, ऍड. मंदार जोशी, संगमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, ऍड. अर्चिता जोशी, निलेश अल्हाट, बाबुराव घाडगे, संजय सोनवणे, मोहन जगताप, विरेन साठे, श्याम सदाफुले, निलेश रोकडे, अक्षय गायकवाड, आनंद लवटे, जयदेव रंधवे, महादेव साळवे आदी उपस्थित होते.
अविनाश महातेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे लाखो लोकांचे जीवन प्रकाशमय झाले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने दिव्यांना प्रज्वलित करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. यातून प्रेरणा घेऊन संविधानाचा प्रकाश समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण करावे.”