उरुळी कांचन, (पुणे) : येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आला आहे. पतसंस्थेची २९ वि वार्षिक सर्वसाधारण सभा उरुळी कांचन येथील कार्यालयात गुरुवारी (ता. ०८) पार पडली. यावेळी सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी दिली.
उरुळी कांचन येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा घेण्यात आली यावेळी यावेळी बहुसंख्येने सर्व शाखांचे सभासद उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सभासद असलेले उरुळीकांचन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल श्री राजेंद्र बबन कांचन व खामगाव टेक च्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल श्री मारूती किसन थोरात यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे नियमित कर्ज भरणा-या कर्जदारांना यावेळी सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या वार्षिक सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
डॉ. मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन श्री ज्ञानोबा ( माऊली ) कांचन, कोंडीराम (भाऊ) चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभासदांनी आपल्या सुचना मांडल्या त्यामध्ये केडगाव शाखेचे सल्लागार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, व्यापारी असोसिएशन उरुळी कांचनचे अध्यक्ष संतोष कांचन माजी सरपंच संतोष हरीभाऊ कांचन, रंगनाथ कड, लक्ष्मण म्हस्के, शांताराम चौधरी, अशोक टिळेकर, सुरेश सातव, बाळासाहेब चौधरी समावेश होता. सदर सभेस संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरूसवाणी, चंद्रकांत लोणारी, बाळासाहेब कांचन, जनार्दन गोते, सारीका काळभोर, माया शितोळे, प्रकाश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले. अहवाल वाचन संस्थेचे मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी केले.
यावेळी उपस्थितांना संस्थेबद्दल अधिक माहिती देताना राजेंद्र कांचन म्हणाले, संस्थेच्या ३१ मार्च २०२२ अखेर ठेवी २२५ कोटी ४४ लाख, कर्ज १६५ कोटी ९० लाख व गुंतवणूक ८८ कोटी १३ लाख आहे. संस्थेस ४ कोटी ९० लाख ढोबळ नफा व तरतुदी केल्यानंतर २ कोटी ९७ लाख निव्वळ नफा झाला आहे. पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने १०० महिन्यात मणिअमृतमहोत्सव दामदुप्पट ठेव योजना सुरू करणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी जाहीर केले.