गणेश सुळ / केडगाव : दौंड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या मुळा – मुठा अन् भीमा नदीपट्ट्यात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यासाठी दडन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे बिबट्यांची संख्या वाढतच चालली आहे. सध्या सर्वत्र ऊसतोड चालु असल्याने बिबटे सैरवैर होऊन बाहेर निघत आहेत.
पारगाव, नानगाव, राहु, देलवडी, पिंपळगाव अशा अनेक गावामध्ये बिबट्यांची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झालेली आहे. या सर्व प्रकारामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे ‘बिबटे काही जगू देईनात’ अशी अवस्था येथील नागरिकांची झाली आहे.
भीमा व मुळा -मुठा नदीपट्ट्यात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आढळून येत आहे. मात्र अलीकडे जनावरांवर व माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी बिबटे जीवघेणे ठरू लागले आहेत. दौंडच्या नानगाव, पारगाव, हातवळण, कानगाव, गार, तर शिरूमधील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, नागरगाव, रांजणगाव सांडस हद्दीत पाळीव जनावरांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे.
तर कडेठाण येथील शेतकरी महिला, बोरीपार्धी येथे ऊसतोड कामगाराच्या लहान बालकासह मांडवगण फराटा येथील दोन लहान मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून या भागातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. बागायती भाग असल्याने बिबट्यांना अनुकूल वातावरण लाभत आहे. त्यांची पैदासही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
याचे उदाहरण म्हणजे ऊसतोड फडातून अनेक ठिकाणीं बिबट्यांची पिल्ले बाहेर पडताना दिसत आहेत. बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. दिवसाही घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे. शेतीची कामे करणे देखील अवघड होऊन बसले आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर वन विभाग अनेक उपाययोजना करत आहेत, परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. त्यासाठी ठोस उपायोजना होईपर्यंत किती निष्पाप बळी जाणार? असा प्रश्न जनतेतून समोर येत आहे.