पुणे : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने घटनेच्या 22 ते 23 दिवसांनी शरणागती पत्कारली आहे.
वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे, जे या प्रकरणात दोषी असतील त्या कोणालाही आम्ही सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माजी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.
तसेच अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतीले जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोणालाही सोडणार नाही
वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होणार का? या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले कि, कोणता गुन्हा दाखल होईल? कसा होईल? याबाबत सगळी माहिती पोलीस देतील. ते पोलिसांचे काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.