कुटुंबातील नातेसंबंध प्रेम आणि सहकार्यावर आधारित असतात. मात्र, काहीवेळा जेव्हा नात्याचा आदर केला जात नाही तेव्हा हे नाते ओझे बनते. नातेसंबंधांमध्ये संतुलन राखण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य लिमिट ठरवून देणं हे गरजेचे असते. अशाने नात्यात कटुता येत नाही आणि वेळीच मर्यादा लावल्याने समोरची व्यक्तीही त्याचा गैरफायदा घेत नाही.
वैयक्तिक वेळेचा नात्यात आदर करा. कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे असते. मात्र, प्रत्येकाला स्वतःसाठीही वेळ हवा असतो. ही वेळ एखाद्याच्या छंद, विश्रांती किंवा आत्म-चिंतनासाठी असू शकते. हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपल्या वैयक्तिक वेळेला प्राधान्य देणे स्वार्थी नाही. मात्र, मानसिक शांतीसाठी आवश्यक आहे. तुमचा वैयक्तिक वेळ असो, आयुष्यातील निर्णय असो किंवा आर्थिक समस्या असो प्रत्येक क्षेत्रात सीमारेषा निश्चित केल्याने संबंध अधिक चांगले आणि मजबूत होतात.
प्रत्येकाला त्यांची प्रायव्हसी अर्थात नात्यात मोकळीक हवी असते. तुमचा फोन असो, वैयक्तिक संभाषण असो किंवा वैयक्तिक सामान असो, कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे. परवानगीशिवाय एखाद्याच्या गोष्टीत ढवळाढवळ केल्याने नातेसंबंध बिघडू शकतात. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे लागते.