पुणे : पुण्यात धडाकेबाज पोलिसांसोबत दुजाभाव ; पोलिस उपायुक्तांच्या ड्रायव्हरला २१ हजारांचे बक्षीस तर गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त १०० रुपयाचे बक्षीस दिले जाते. अशा टीका सोशल मिडीयावर झाल्या होत्या. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील काही दिवस कोणीही बक्षीस देऊ नये, अशा सूचना गुप्ता यांनी दिल्या आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात गुरुवारी (ता.१३) गुन्हे आढावा बैठक झाली. या बैठकीत पोलीस आयुक्त गुप्ता यांनी वरील सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पोलीस उपायुक्तांनी मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर बक्षिसांची खैरात केली होती, त्याचवेळी दुसरीकडे चांगली कामगिरी करणाऱ्या पथकांची तुटपुंज्या बक्षिसांवर बोळवण केली होती. त्याची शहर पोलीस दलात मोठी चर्चा होऊन त्यावर टीका झाली होती.
प्रत्येक पोलीस आयुक्तालयाला रिवॉर्ड देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो. शासनाच्या बक्षीस मंजूर करण्याच्या नियमावलीनुसार पोलीस उपायुक्त ३५ हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचे अधिकार आहेत. मात्र अनेकदा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दुपटीहून अधिक बक्षिसे देत असल्याचे दिसून येत आहे.