अमेरिका : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय कृषी उत्पादनांवर 100% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कांदा, कापूस आणि द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ धोरणाची घोषणा केल्यानंतर भारताच्या शेती उत्पादनावर 100% आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे.हा नवा कर आजपासून (2 एप्रिलपासून) लागू होणार असून, त्यामुळे भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर त्वरित परिणाम होणार आहे.महाराष्ट्र हे कृषी उत्पादनासाठी महत्त्वाचे राज्य असून, द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, संत्री, ऊस, कांदा आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यापैकी द्राक्ष आणि बेदाण्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे अमेरिकेला या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.अमेरिकेच्या नव्या कर प्रणालीमुळे या उत्पादनांचे दर तिथे वाढतील, परिणामी मागणी घटेल आणि निर्यातदार तसेच शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होईल.अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना, निर्यातीला फटका बसल्यास त्यांची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठं संकट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या यांनी सांगितले की, इतर देशांनी अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर लावल्यामुळे त्यांच्या उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या उत्पादकांचे हित जपण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.