पुणे : पुणे शहरातून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून नेऊन खाल्ले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज बुधवारी (दि. ८) घडली आहे. या घटनेने पुणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमित अंत्यविधी केले जातात. पुणे शहरात 29 स्मशानभूमी आहेत. त्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमी सर्वात मोठी असून, तेथे सर्वात जास्त पार्थिवांचे दहन केले जाते. या स्मशानभूमीत मानवी मृतदेह जाळण्याची जबाबदारी असलेल्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे मृतदेह पूर्ण जळत नसल्याची चर्चा नागरिक करत आहेत. यामुळे अर्धवट जळलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांसाठी सहज उपलब्ध होतात. या गंभीर घटनेचा व्हिडिओ आज समोर आल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे.
स्मशानभूमीत मृतदेह जळल्यानंतर देखरेख आणि सुरक्षिततेची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांना प्रवेश मिळतो. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. मानवी मृतदेहाचा असा अपमान होणे ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी करत अशा प्रकरणावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
View this post on Instagram