पिंपरी: येथील आळंदी नगर परिषद हद्दीतील भागीरथी नाल्यावर पिसाळलेला कुत्रा चावल्याने आळंदीतील लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ६६ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऊर्मिला शिंदे यांनी दिली.
आळंदी येथील घाणीचे साम्राज्य असलेल्या भागीरथी नाल्यावरून ये-जा करीत असताना पिसाळलेला कुत्रा अनेकांना चावल्याने अनेक जण जखमी झाले. यात रविवारी (दि. १५) २० जणांना कुत्रा चावल्याने तसेच सोमवारी (दि. १६) दुपारी दोनपर्यंत ४४ जणांना, तर दुपारी दोननंतर आणखी २ जणांना कुत्रा चावल्याने नागरिकांत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत पसरली. भागीरथी नाल्यावर अखेर हा कुत्रा जखमी झाल्याने तसेच त्याच्या अंगावर पाणी टाकत त्यास बांधून ठेवण्याची मोठी कसरत नागरिकांनी केली. दरम्यान, आळंदी नगर परिषद प्रशासनास कळवण्यात आले. या वेळी पिंपरी-चिंचवड पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यात कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारास सुपूर्द करण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.