पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर ससून रुग्णालयावर जोरदार टीका झाली. यामुळे ससूनच्या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून बेवारस रुग्णांना ससूनमध्ये आणू नका असं आवाहन करण्यात आले आहे.
ससून रुग्णालयाच्याही काही बाजू आहेत त्या देखील समजून घेणे आवश्यक आहे. अजूनही रुग्णालयात बेवारस ४८ रुग्ण आहेत. त्यांचा भार येथील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यावर पडत आहेत, असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचा उपचार सार्वजनिक आराेग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकेच्या सर्वसामान्य रुग्णालयांमध्ये आणि पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम हाॅस्पिटलमध्ये होऊ शकतो. असं असतानाही सर्वच रुग्ण ससूनमध्ये पाठविले जातात. त्यामुळे येथे पेशंटची संख्या वाढून रुग्णालयावर ओझे पडते.
ससून रुग्णालय हे टर्शरी केअर रुग्णालय असून येथे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण आणि गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहे. तसेच जे उपचार इतरही सरकारी रुग्णालयामध्ये होतात ते रुग्ण इथे आणणे अपेक्षित नाही. त्यापैकीच काही बेवारस पेशंट देखील असतात. ज्यांना किरकोळ दुखापतीमुळे ससून रुग्णालयामध्ये पाठवले जातात. अशा रुग्णांना थेट ससूनमध्ये न आणता जवळच्या सरकारी रुग्णालयात देखील उपचार करण्यात यावेत, असे आवाहन ससून रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
आम्ही किती भार सहन करायचा
बेवारस पेशंट सोबत कोणी नसल्याने, तसेच त्यांना जर चालता येत नसल्यास त्यांचे कपडे बदलण्यापासून वैयक्तिक स्वच्छतेसाठी मदत करण्याचे काम ससून रुग्णालयातील कर्मचारी करतात. प्रत्येक वॉर्डमध्ये ६० ते ७० रुग्णांमागे एक ते दोनच परिचारिका असतात आणि एक ते दोन सेवक असतात. ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळे आम्ही किती भार सहन करायचा असा प्रश्न ससून रुग्णालयाकडून विचारला जात आहे.