लहू चव्हाण
पाचगणी : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही उदात्त भावना प्रत्येकाने मनात ठेवली तर नक्कीच समाज सेवा हीच ईश्वर सेवा ठरू शकते, अशी भावना जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी व्यक्त केली. पांचगणी येथील प्रसिद्ध धनंजय उद्योग समूहाचे ‘ धनंजय फूड प्रोडक्ट्सचे ‘ वतीने कै. कृष्णाबाई विठ्ठल परदेशी यांचे स्मरणार्थ नंदकुमार विठ्ठल परदेशी व धनंजय विठ्ठल परदेशी यांचे सौजन्याने जि. प. प्राथमिक शाळा खिंगर येथील ९० विद्यार्थी व शिक्षक यांना स्पोर्ट्स ड्रेसचे नुकतेच वाटप प्रसंगी राजपुरे बोलत होते.
यावेळी खिंगरचे सरपंच दिनकर मोरे, उपसरपंच विठ्ठल दुधाणे, माजी सरपंच अशोक दुधाणे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पवार, आंब्रळ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप आंब्राळे, युवा उद्योजक नितीनशेठ दुधाणे, युवा उद्योजक व उपाध्यक्ष रोटरी क्लब पांचगणी, स्वप्निल परदेशी व परदेशी परिवार, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन दुधाणे, ग्रामसेविका सपना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
राजपुरे पुढे म्हणाले मराठी शाळा हळूहळू कात टाकत असून, डिजिटल क्रांतीमुळे शाळेत विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने येत असून, पटसंख्यादेखील वाढत आहे.
कै. कृष्णाबाई विठ्ठल परदेशी यांचे स्मरणार्थ नंदकुमार विठ्ठल परदेशी व धनंजय विठ्ठल परदेशी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय पार्टे यांनी सुत्रसंचलन तर शंकर दुधाणे यांनी आभार मानले.
यावेळी शिक्षक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.