-संतोष पवार
पळसदेव : अन्न पोषण व सुरक्षा अभियानातंर्गत इंदापूर तालुक्यात रब्बीतील ज्वारी, मका, हरभरा, व ऊसातील आंतरपिकातील हरभऱ्यासाठी निविष्ठा मोफत पुरविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी दिली.
कळस (ता. इंदापूर) येथे अन्न पोषण व सुरक्षा अभियानातंर्गत पौष्टिक तृणधान्य योजनेतून शेतकऱ्यांना मोफत ज्वारीचे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक गोपाळ खंडागळे, कृषी सेविका नेहा टिळेकर, सुनिल ओमासे, श्याम धायतोंडे, विजय गावडे, संजय राऊत, दिलीप खटके यांसह शेतकरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, अन्न पोषण व सुरक्षा अभियानातंर्गत पौष्टिक तृणधान्य योजनेतून तालुक्यातील सुमारे 450 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. यामध्ये सुमारे 1200 शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना मोफत बियाणे व निविष्ठांचे वाटप केले जाणार आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बीबीएफ यंत्रणे पेरणी करुन निविष्ठा देणे गरजेचे आहे. याशिवाय पौष्टिक भरडधान्य योजनेतून सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावर मका पेरणीसाठी 500 शेतकऱ्यांची निवड करुन त्यांनाही बियाणे व निविष्ठा पुरविल्या जाणार आहेत. पौष्ठिक कडधान्य योजनेतून 30 हेक्टर क्षेत्रासाठी 75 शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. तर व्यापारी पिके योजनेतून ऊसामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठांसाठी 70 हेक्टरवरील सुमारे 175 शेतकरी निवडले जाणार आहेत. या योजनांमधून तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी निवडला जाणार आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतातील पिकांचे संगोपन करणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून शेती मालाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. शिवाय ज्वारी, हरभरा व गहू पेरणी करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना 40 ते 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भिगवण येथील महाराष्ट्र अॅग्रो एजन्सी, सणसर येथील श्रीराम कृषी सेवा केंद्र व इंदापूर येथील कृषी संपदा या दुकानात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी आधार कार्ड व सात बारा, आठ अ उतारा घेवून अनुदानावर बियाणे खरेदी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी केले.