लोणी काळभोर, (पुणे) : आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील शितळा देवी नगर परिसरात राहणाऱ्या चाळीस कुटुंबाना बँक ऑफ बडोदा थेऊर शाखेच्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून स्वच्छ्ता किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी ज्ञानगंगाचे अध्यक्ष सचिन माथेफोड यांनी सांगितले की, “मागील दोन महिन्यांपासून सदरील वस्तीमध्ये स्वच्छ्ता मोहीम व जनजागृती सुरू असून अगदी थोड्या कालावधीत येथील तरुण वर्ग व महिला वर्ग एकत्रित आला आहे. त्यामुळे प्रत्येक रविवारी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. वस्ती अंतर्गत रस्त्याची सोय असेल, वृक्षारोपण, कचराकुंडी प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प याठिकाणी राबविले गेले आहेत.” यावेळी बँकेने देखील सदरील वस्तीसाठी भविष्यात गरजेच्या लागणाऱ्या वस्तू देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी नंदिनी गायकवाड, क्षेत्रीय प्रबंधक पुणे जिल्हा, वैभव पाटील शाखा प्रबंधक थेऊर शाखा, बँकेतील प्रतीक भट्ट, समाधान वाघ, आळंदी म्हातोबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच मनीषा भोंडवे, वाल्मीक जवळकर, सुभाष जवळकर, रमेश भोंडवे, माऊली जवळकर, ताराचंद जवळकर मान्यवर उपस्थित होते.