पुणे : बारामती लोकसभेच्या (Baramati Loksabha Election) मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वाढत्या उन्हाचा विचार करता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणा-या मतदारांसाठी एक हजार 724 प्रथमोचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी 10 ओआरएसच्या पाकिटांचे वितरण जिल्हा प्रशासनाने केले आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, मतदान यंत्र आणि साहित्याचे वाटप कर्मचा-यांना करण्यात आले आहे. मतदान खोल्यांमध्ये विविध मुलभूत सुविधा सज्ज असून, मतदानासाठी एकूण 1608 मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत.
मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास प्राथमिक उपचार देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी 232, इंदापूर 252, बारामती 280, पुरंदर 244, भोर 525 आणि खडकवासला 191 याप्रमाणे 1 हजार 724 कीटचे वितरण केले. तर 2 हजार 516 मतदान केंद्रांना 25160 ओआरएसच्या पाकिटांचे वितरण केले. साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक अधिकारी रेश्मा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक समन्वयक अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीत मेडिकल किटचे वितरण करण्यात आले आहे.