लोणी काळभोर : शौर्य दिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतात. त्यामुळे त्यांना पौष्टिक आहार व पिण्याच्या पाण्याची अतंत्य गरज असते. ही गरज लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व थेऊर येथील बांधवांनी ओळखली. आणि आपण समाजाचे काहीतरी देणे असते, या निस्वार्थी भावनेने भीम अनुयायांसाठी अन्नदान, मोफत आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रम बुधवारी (ता.1) राबविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा सुमारे 10 हजाराहून अधिक भीम अनुयानांना फायदा झाला आहे.
लोणी कॉर्नर, थेऊर फाटा व थेऊर गावात मोठ्या प्रमाणात अन्नदान व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तर कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या अनुयायांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी रक्तदान शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे, माजी सरपंच सचिन तुपे, थेऊरचे उपसरपंच भाऊसाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य गौतमी कांबळे, दीपक अडागळे, ॲड. सुजित कांबळे, संजय भालेराव, दिनेश कांबळे, अजित भालेराव, राकेश शेलार, संजय कांबळे, भोलेनाथ शेलार, रमेश भोसले, संतोष भोसले, सूर्यकांत काळभोर, नईम इनामदार, विजय सकट, ज्ञानेश्वर नामुगडे, अमित कांबळे, महेश जैनजांगडे, भाऊ बडेकर, राहुल गायकवाड, सोनू शेंडगे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व थेऊर बांधवांनी शौर्य दिनासाठी अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच त्यांना अन्नदान, पाणी व आरोग्य सेवा देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच यावेळी आलेल्या हजारो भीम अनुयायांनी चारही गावातील नागरिकांचे आभार मानले.
लढाईच्या स्मरणार्थ विजय स्तंभ..
1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली होती. या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. हे युद्ध जिंकल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला आहे. या विजय स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 ला भेट दिली. आणि हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. भीम अनुयायी या ठिकाणी येवून त्या लढाईत गतप्राण झालेल्या शूरवीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहतात.