पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट या दोन वस्तू दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या भेटवस्तूची सध्या जोरदार चर्चा होत असून याचा व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबकडून करण्यात आला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब देखील घेण्यात आले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा पबकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले असून मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून पार्टीत येणाऱ्यांना कंडोम आणि ओआरएसचे पाकीट वाटप करण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे कृत्य
शहरातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,” असे या पत्रात लिहले आहे. अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.