नाशिक : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला आता त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुती जोरदार तयारीला लागली आहे. सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. परंतु, जागावाटपावरून महायुतीत खटके उडत असल्याचं समोर आलं आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी निफाड तसेच कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुद्धा घेतला. महायुतीतील जागावाटपात हे दोन्ही मतदारसंघ आपल्या वाटेला येतील. त्यामुळे आतापासूनच निवडणुकीसाठी जोरदार तयारी करा, असं अजित पवार यांनी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. यावरून आता भाजपचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले असून विधानसभेत हे दोन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवे, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. इतकंच नाही, तर अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर निफाड मतदारसंघात भाजपने ठराव देखील घेतला आहे. अशी माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी, यासाठी निफाड मतदारसंघात हा ठराव करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाने या मतदारसंघातून आपल्याला कसलीच मदत केली नाही, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे विधासभेच्या जागावाटपाआधीच महायुतीत वादाचे खटके उडू लागण्यास सुरुवात झाली आहे.
निफाड हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून याठिकाणी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. विशेष म्हणजे, शुक्रवारीच अजित पवार यांनी दिलीप बनकर यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर दिवसभर अजित पवार कळवण-सुरगाणा मतदार संघाचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सक्रीय होऊन त्यांनी ठराव पास केला.