पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

पुरुषोत्तम जगताप यांनी ‘लोकनेता अजितदादा पॅनल’ असे नाव देऊन स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यावर पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जगताप यांनी अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, सुनेत्रा पवार यांचा मॉर्फ्ड व्हिडिओ आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अजित पवार यांच्या बनावट आवाजातील व्हिडिओ प्रचारात चालवल्याचा दावा करत जय पवार यांनी जगताप यांच्यावर कडक कायदेशीर आणि पक्षीय कारवाईचा इशारा दिला आहे.

जय पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, ही निवडणूक राजकीय नसून शेतकऱ्यांच्या हिताशी आणि पोटापाण्याशी जोडलेली आहे. अजित पवार हेच माझे राजकीय गुरू असून त्यांच्या विचारांवरच कारखान्याचा कारभार चालवला आहे. कारखान्याला मिळालेले 13 पुरस्कार आणि उच्चांकी ऊसदर हा अजितदादांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. आपला पॅनल पूर्णपणे पक्षविरहित असून, विरोधी पॅनलमधील उमेदवार हे सुनेत्रा पवार यांचे नसून काकडे गटाचे असल्याचा दावाही त्यांनी केला.

या घडामोडींमुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ संचालकपदापुरती मर्यादित न राहता अजित पवारांच्या राजकीय वारशावर हक्क सांगण्याची लढाई बनली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनल, पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनल आणि युगेंद्र पवार यांचे ‘शेतकरी विकास पॅनल’ अशी जोरदार तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. येत्या 11 तारखेला होणाऱ्या मतदानात कारखान्याचे सभासद नक्की कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







