येरमाळा : पारधी समाजातील भावकीच्या दोन कुटुंबांत शेतातील विहिरीचे पाणी घेण्याच्या वादातून तुंबळ हाणामारी होऊन तिघांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ही थरारक घटना धाराशिव जिल्ह्यातील बावी शिवारात (ता. वाशी) रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे.
सुनील अनिल काळे (वय-२१, रा. बोरी, ता. वाशी), आप्पा भाऊ काळे (वय-६०), परमेश्वर आप्पा काळे (वय-२७, दोघे रा. बावी, ता. वाशी) हे वडील, मुलगा व पुतण्या अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत वैजांताबाई आप्पा काळे (५०, रा. बावी) या जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांना ताब्यात घेतले असून येरमाळा ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
बावी येथील मांग शेत शिवारात पारधी समाजाची शेतजमीन आहे. या ठिकाणी मृत सुनील काळे, आप्पा भाऊ काळे यांची जमीन आहे. त्यांच्यात जुन्या वादातून खटके उडत होते. त्यातच शेतातील विहिरीचे पाणी वाटून घेण्यावरून रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन कुटुंबांतील दोन गटांत सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून जुने वाद विकोपाला गेले. पाण्याचा वाद उफाळल्याने तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून काठ्या, दगड, कत्ती, चाकूने एकमेकांवर हल्ला करण्यात आला.
यात पुतण्या सुनील काळे, आप्पा काळे, परमेश्वर काळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैजांताबाई काळे ही महिला या मारहाणीत जखमी झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह तसेच जखमींना वाशी, तेरखेडा, धाराशिव येथील रुग्णालयात हलवले.
या प्रकरणी वंदना काळे यांच्या फिर्यादीनुसार, येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांनी ५ संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास करून इतर आरोपींचाही शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.