लोणी काळभोर : अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे.
डॉ. अदिती कराड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (ता.१७) आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरांमध्ये ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांची दंत व श्रवणशक्ती तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना दंत चिकित्सा किट देण्यात आले. तसेच विश्वराज हॉस्पिटलमधील ज्या कर्मचाऱ्यांची मुले दहावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाली, त्या मुलांचा डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते आज सत्कार करून गौरविण्यात आले.
डॉ. अदिती कराड म्हणाल्या की, ‘विश्वराज हॉस्पिटलमध्ये ज्या मुलांची आज तपासणी करण्यात आली आहे. त्या मुलांना विश्वराज रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. तसेच पुढील २ ते ३ वर्षात पुण्यात उच्च दर्जाच्या सेवा देणारे प्रीमियर हेल्थकेअर प्रदाता म्हणून विश्वराज हॉस्पिटलची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात विश्वराज हॉस्पिटलचा डंका
या यशस्वी वाटचालीसाठी मला आईवडील, सासरे व पती यांच्या बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच विश्वराज हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठी साथ दिली आहे. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात विश्वराज हॉस्पिटलचा डंका वाजतगाजत आहे. याशिवाय, महिलांना त्यांच्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळवण्यावर भर दिला. माझ्या दृष्टीमध्ये रुग्णालयाला अभूतपूर्व यश मिळवून देणे. आणि आपले कर्मचारी व सल्लागार यांच्या सामूहिक प्रयत्नांनी ते साध्य करणे हेच ध्येय आहे. मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. असे यावेळी बोलताना डॉ. अदिती कराड म्हणाल्या.
लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुक
वाढदिवस साजरा करताना अनेकजण अनावश्यक अवाढव्य खर्च करत असतात. मात्र, हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत डॉ. अदिती कराड यांनी हा उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.